अमळनेर : जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अमळनेर व जळगाव शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत दोन्ही ठिकाणांहून एकूण १ लाख ६ हजार ३२५ रुपये किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे जिल्हा सहायक आयुक्त (औषधे) डॉ. प्र. भा. अस्वार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी अमळनेर येथील रविंद्रनगर परिसरातील श्रीमती प्रियदर्शनी रजाळे यांच्या ठिकाणी, तर २४ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील महाबळ परिसरातील श्रीमती राशी तळरेजा यांच्या ठिकाणी पंचांसमक्ष तपासणी व चौकशी करण्यात आली.
अमळनेर येथील कारवाईत ७२ हजार ३९२ रुपये, तर जळगाव येथील कारवाईत ३३ हजार ९३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान विविध प्रकारचे लेबल असलेले तसेच विनालेबल क्रीम, पावडर, जेल स्वरूपातील उत्पादने, प्रिंटेड लेबल्स, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मिती व पॅकिंगसाठी लागणारे साहित्य आढळून आले.
सदर सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला वैध उत्पादन परवाना नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले. तसेच उत्पादनांची गुणवत्ता तपासणी न करता त्यांची विक्री केली जात असल्याचेही आढळून आले.
जप्त केलेल्या मालामध्ये विविध प्रकारच्या क्रीम, पावडर, जेल स्वरूपातील सौंदर्यप्रसाधने तसेच पॅकिंग साहित्याचा समावेश आहे. यातील काही सौंदर्यप्रसाधनांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई डॉ. अस्वार यांच्यासह अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील श्रीमती क. र. पाटील व त्यांच्या पथकाने नाशिक विभागाचे सहआयुक्त (औषधे) अशोक बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
दरम्यान, नागरिकांनी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यांच्या लेबलवर उत्पादन परवाना क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदतबाह्यता तारीख आदी माहिती नमूद आहे की नाही, याची खात्री करूनच सौंदर्यप्रसाधने खरेदी करावीत, असे आवाहन डॉ. अस्वार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
(बातमीत वापरलेले छायाचित्रे प्रतिघात्मक आहेत)
