जितेंद्र पाटील
नाशिक, पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारचे औचित्य साधून नाशिकच्या सिडको परिसरात भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या *’देवजाल वेलफेअर फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य’* च्या वतीने ८०० बेल (बिल्व) रोपांच्या मोफत वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

भगवान शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते. श्रावणात शिवभक्त महादेवाला बेलपत्र अर्पण करतात. मात्र केवळ पाने वाहण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येकाने आपल्या दारी एक बेल वृक्ष लावून निसर्गाचे संवर्धन करावे, या हेतूने *”एक बेल वृक्ष महादेवासाठी, एक पाऊल निसर्गासाठी”* आणि *”एक बेल वृक्ष शिवाला अर्पण, निसर्गाला संरक्षण”* या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
हा कार्यक्रम सिडको येथील पाटील नगर, मनपसंद स्विट्स जवळील *श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर* परिसरात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी दर्शनासाठी आलेल्या शेकडो शिवभक्तांना आणि निसर्गप्रेमींना बेल रोपांचे वाटप करण्यात आले. रोपे स्वीकारताना भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तीभाव ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी संस्थेच्या प्रतिनिधींनी बेल वृक्षाचे महत्त्व विशद केले. बेल वृक्ष परिसर ऑक्सिजनयुक्त आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. आयुर्वेदात बेलाच्या पाने आणि फळाला औषधी महत्त्व असून, घराजवळ बेल वृक्ष असल्यास समृद्धी आणि मानसिक शांती लाभते, असे सांगण्यात आले.
*’देवजाल वेलफेअर फाउंडेशन’* ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, विद्यार्थी सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे. *”निसर्ग आणि मानवता जपा, मनःशांती व पुण्य मिळवा”* या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने हा हरित उपक्रम हाती घेतला असून मंदिर संस्थान व स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष *श्री. प्रमोद रनमाळे* यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
