छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २१) घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत.

कुणाल याचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला.
पोलिस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला. लल्या बेटा घरी चल, आपण बोलूयात, असे म्हणत वडील त्याला समजवून सांगत होते. वडील वर पोहोचल्यावर त्यांनी लल्या असं म्हणत त्याला खेचण्याचा प्रयत्न केला अन् दोघंही खाली कोसळले.
दरम्यान, चांदगुडे परिवारातील मोठ्या मुलाचं सहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यानंतर कुटूंबात सतत खटके उडायचे. वडील ट्रकचालक असल्याने त्यांना सतत बाहेर रहावं लागायचं. घरी आले की भांडणं सतत होत असायची. अशातच तीन महिन्यानंतर वडील घरी आल्यानंतर पुन्हा खटके उडू लागले अन् दोन दिवसांपासून घरी भांडणं होती, अशी माहिती समोर आली आहे.
सदर घटनेवर पोलिस म्हणाले, आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. त्याची आईही समोर बसून त्याला समजावत होती. मुलाचे मनपरिवर्तनही होत होते. मात्र त्या गर्दीमधून वडील आहे, ते वडील होते, हे पोलिसांना माहिती नव्हते. वडील अचानक डोंगरावर आले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तोल गेल्यामुळे मुलासह त्यांचाही खाली पडून मृत्यू झाला. आईने हे बघताच तिनेही त्यांच्यामागून तात्काळ डोंगरावरुन उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली
