नवापूर : पोलीस वृत्त – गुजरातमधील सुरत येथून आंध्र प्रदेशातील विजयवाडाकडे कंटेनरद्वारे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नवापूर पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून मोठी कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूसह कंटेनर असा एकूण ३५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी नवापूर येथील एका हॉटेलजवळ महामार्गावर नाकाबंदी करून कंटेनर (क्र. RJ-19 JK-1963) अडवून त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध साहित्याच्या पार्सलखाली लपवून ठेवलेला प्रतिबंधित तंबाखूचा साठा आढळून आला.
यामध्ये २ लाख २० हजार रुपये किमतीचे ‘मेजबान जाफरानी जर्दा’ तंबाखूचे ५०० मोठे पॅकेट तसेच ३ लाख रुपये किमतीची सुगंधी तंबाखूची ३० मोठी गोल्डन रंगाची पॅकेट जप्त करण्यात आली. याशिवाय सुमारे ३० लाख रुपये किमतीचा कंटेनरही पोलिसांनी ताब्यात घेतला. एकूण ३५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कंटेनर चालक कायमदीन खान सुलतानखान (वय २२, रा. श्यामपुरा, जि. बारमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे तसेच पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.



