बीड : पोलीस वृत्त न्युज – पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन झाला नाही. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना खामकरवाडी गावात (जि.बीड) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावाकडे समजल्यानंतर खामकर परिवारासह, नातेवाईक, गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय 42) यांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का राहीताई यांना सहन झाला नाही. राहीताई खामकर यांनी कोणालाही न समजू देता विषारी द्रव प्राशन केला. सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेले. यावेळी राहीताई खामकर यांनी उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मला देखील माझ्या पतीच्या चितेवरच अग्निडाग द्या म्हणून सांगत होत्या.
शिरूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बीडला पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. खामकरवाडी येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर कन्नालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर दोघांना अग्निडाग दिला. अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांच्या अश्रूचा बांध फुटला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे