राज्यात सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असतानाच धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच करंडे कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत कृष्णा करंडे हा एकमेव तरुण बचावला असून, संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने येडशी गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंडे कुटुंब किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात लावलेल्या पणत्यांमुळे अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. घरातून बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग असलेल्या जिन्याच्या परिसरातच आग भडकल्याने कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीचा दाट धूर आणि प्रचंड उष्णतेमुळे सहा जणांचा गुदमरून दुर्दैवी अंत झाला.

दिवाळीचा आनंद ठरला अखेरची भेट….
मृतांमध्ये कृष्णा करंडे याच्या बहिणीचाही समावेश आहे. ती शिक्षणासाठी घरापासून दूर राहत होती. दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी ती घरी आली होती. मात्र, हीच कुटुंबासोबतची तिची अखेरची भेट ठरेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. कृष्णा शिक्षणासोबतच दररोज वडिलांच्या किराणा दुकानात मदत करत होता. या दुर्घटनेत त्याने संपूर्ण कुटुंब गमावल्याने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांसह अग्निशामक दलाचे प्रयत्न निष्फळ
घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री गावकऱ्यांनी आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता प्रचंड असल्याने सहा जणांचे प्राण वाचवता आले नाहीत. दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि तिचा प्रसार कसा झाला, याचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
