अमळनेर : तालुक्यातील कावपिंप्री शिवारात ठिबक सिंचनाच्या नळ्यांच्या गुंडाळीत अडकून एका काळविटाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी अडकलेल्या दुसऱ्या काळविटाला मात्र शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले असून, त्याची सुटका करून त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले.

कावपिंप्री येथील ज्ञानेश्वर माधवराव पाटील यांच्या शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्यांच्या गुंडाळीत दोन काळवीट अडकल्याचे ज्ञानेश्वर पाटील आणि दिनेश पाटील यांच्या निदर्शनास आले. यानंतर दिनेश पाटील यांनी तातडीने वनपाल गुलाब पिंजारी यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, धनंजय पाटील, विनोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण पाटील, योगेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी तत्परता दाखवत ठिबक नळ्यांचा गुंता सोडवून एका काळविटाची सुटका केली. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले. मात्र, दुसऱ्या काळविटाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका काळविटाचे प्राण वाचले.
