जळगाव: यावल प्रेमाखातर घरच्यांच्या विरोधात जाऊन संसार थाटलेल्या अवघ्या २० वर्षीय विवाहितेचा तिच्याच पतीने खून केल्याची धक्कादायक घटना यावल शहरातील अयेशा नगरात उघडकीस आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे यावल शहरात मोठी खळबळ उडाली असून, मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिस ठाण्यात आईने केलेला आक्रोश उपस्थितांचेही मन हेलावून टाकणारा होता.
यावल येथील अयेशा नगरात फरदीन खान आरिफ खान आणि त्याची पत्नी मशिराबी फरदीन खान हे वास्तव्यास होते. मंगळवारी घरात दोघेच असताना चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान मशिराबीने पती फरदीनच्या कानशिलात लगावली. याचाच राग मनात धरून संतप्त झालेल्या फरदीनने पत्नीचा गळा दाबून तिचा खून केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पसार झालेल्या आरोपी फरदीन खानला ताब्यात घेतले. दरम्यान, सुरत येथून यावलमध्ये धाव घेतलेल्या मृत मशिराबीच्या आई सफीयाबी सय्यद अक्रम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेकीच्या मृत्यूने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस ठाण्यातील तिचा आक्रोश उपस्थितांना गहिवरून टाकणारा होता. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद पुढील तपास करीत आहेत.

