जळगाव : राज्यातील अनेक न्यायालयांना एकाच पद्धतीचे बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या धमकीमागे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे.
धमकीचे ई-मेल नेमके कोणत्या ठिकाणाहून पाठविण्यात आले, त्यांचा आयपी ॲड्रेस कोणता आहे, तसेच या प्रकारामागे एकाच व्यक्तीचा हात आहे की अन्य कोणाचाही सहभाग आहे, याची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित ई-मेल केवळ खोडसाळपणातून पाठविण्यात आले आहेत की त्यामागे अन्य काही उद्देश आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, जळगाव न्यायालय परिसरात BDDS (बॉम्ब शोधक व नाशक पथक) मार्फत तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. मात्र, राज्यातील अनेक न्यायालयांना एकाच वेळी धमक्या मिळाल्याने न्यायालयीन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

