जळगाव: तालुक्यातील भोकर येथे स्टेट बँकेच्या शाखेवर शनिवारी दुपारी सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली. हेल्मेट आणि मास्क घालून दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी बँकेत प्रवेश करत रोखपाल आणि शाखा व्यवस्थापकाला एअरगनचा धाक दाखवून लॉकरमधील सुमारे १५ लाखांची रोकड आणि अंदाजे ३५ कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले.

मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक केली. या संपूर्ण दरोड्याचा सूत्रधार बडतर्फ पोलीस फौजदार (उपनिरीक्षक) असल्याचे तपासात समोर आले आहे.
भोकर गावात भरवस्तीत स्टेट बँकेची शाखा आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून चार जण बँकेच्या परिसरात दाखल झाले. चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर हेल्मेट असल्याने त्यांची ओळख पटणे कठीण होते. बँकेत प्रवेश करताच त्यांनी रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक जयेश राणे यांना लक्ष्य केले. दोघांच्या कानाला एअरगन लावून त्यांना लॉकर रूममध्ये जाण्यास भाग पाडण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँकेतील कर्मचारी आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विरोध करताच हवेत झाडल्या दोन फैरी…
बँक कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांच्या आदेशाला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेत दोन राऊंड फायर केले. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली. त्यानंतर दरोडेखोरांनी लॉकर रूममध्ये प्रवेश करून सोने आणि रोकड ताब्यात घेतली. बँकेतील १६ लॉकर्समधील सुमारे ३५ कोटींचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १५ लाख रुपयांची रोकड त्यांनी सहा बॅगांमध्ये भरली. नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकल्यानंतर चौघेही दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.
सोन्याच्या लुटीने खळबळ…
या दरोड्यात सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचे सोने लुटण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रोख रकमेसह एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची लूट झाल्याने पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकेतील कर्मचारी आणि व्यवस्थापकांकडून घटनेची माहिती घेण्यात आली. लुटलेल्या मुद्देमालाचा तपशील तसेच दरोडेखोरांनी वापरलेल्या वाहनांची माहिती पोलिसांनी संकलित करण्यास सुरुवात केली.
पोलीस पाटलांच्या मदतीने नाकाबंदी…
दरोडेखोर पसार झाल्याचे समजताच तालुका पोलिसांनी परिसरातील विविध रस्त्यांवर नाकाबंदी केली. ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची मदत घेत संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. विविध गावांमध्ये शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा माग काढला. अखेर घटनेनंतर अवघ्या दोन तासांच्या आत चौघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
कारागृहाच्या भिंतीआड रचला कट…
या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे दरोड्याचा कट कारागृहातच रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित गजानन पवार हा चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे प्रेयसीच्या पतीच्या खूनप्रकरणी २०२४ पासून कारागृहात होता. त्याच कारागृहात २०२३ मध्ये जळगाव शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँकेवर दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील बडतर्फ फौजदार शंकर जासकही होता. कारागृहात असतानाच दोघांमध्ये संपर्क वाढला आणि भोकर येथील बँक लुटण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
पॅरोल, जामिनावर बाहेर येताच दरोडा…
कारागृहात आखलेल्या योजनेनुसार गजानन पवार आणि शंकर जासक या दोघांनी बाहेर आल्यानंतर इतर साथीदारांना सोबत घेत दरोड्याची तयारी केली. पॅरोल आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष गुन्ह्याच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू केल्या. भोकरच्या स्टेट बँकेतील सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी, कामकाजाची वेळ आणि परिसराची माहिती मिळविण्यासाठी त्यांनी आधीच रेकी केली होती. विशेष म्हणजे चादरी विकणारे फेरीवाले बनून त्यांनी बँकेच्या परिसरात फिरत माहिती गोळा केली होती. त्यामुळे त्यांना बँकेच्या कामकाजाची आणि परिसराची माहिती मिळविणे शक्य झाले.
चौघे संशयित पोलिसांच्या ताब्यात…
भोकर दरोडा प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक (रा. खेडी, जळगाव), अंकुश श्रावण चव्हाण (रा. रामदेव वाडी, ता. जळगाव), गजानन राजेंद्र पवार (रा. न्यायडोंगरी, नाशिक) आणि अंकुश तुळशीराम चव्हाण (रा. खापरखेडा) यांचा समावेश आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याचाच दरोड्याच्या कटातील सहभाग समोर आल्याने पोलीस यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. कारागृहात असताना गुन्हेगारी कट कसा आखला गेला, त्यासाठी बाहेरील साथीदारांशी संपर्क कसा साधण्यात आला आणि दरोड्याच्या नियोजनात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
