जालना: पोलीस वृत्त पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कर्जाचे शुक्लकाष्ट फेडण्यासाठी बीड, जालनासह मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांना दरवर्षी आपल्या जीवाशी खेळावे लागते. परंतु, जालना जिल्ह्यातून समोर आलेली अत्यंत संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. मासिक पाळीमध्ये पोटदुखीच्या वेदनांमुळे मजुरी

बुडू नये, म्हणून जालना जिल्ह्यातील तब्बल १०७ ऊसतोड कामगार महिलांनी आपले गर्भाशय काढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या एका संस्थेने हा प्रकार उजेडात आणला.
घनसावंगी तालुक्यात ६३, तर परतूर तालुक्यातील ४४ अशा एकूण १०७महिलांनी १ ऑगस्ट २०२५ ते २५ ऑक्टोबर २०२६ या १४ महिन्यांच्या कालावधीत आपले गर्भाशय काढले आहे. वेगवेगळ्या गावांत हा प्रकार सुरू असतानाही आरोग्य विभागाला याचा सुगावा कसा लागला नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
ऊसतोडीचे काम करताना मासिक पाळीच्या वेळी पोटात वेदना होत होत्या. आठ ते दहा दिवसांची मजुरी बुडत होती. नुकसान होऊ नये आणि त्रासातून सुटका व्हावी, यासाठी मी खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने खासगी रुग्णालयात गर्भपिशवी काढून घेतली. – ऊसतोड कामगार महिला
ऊसतोड कामगार महिलांनी गर्भपिशवी काढून घेण्याचा निर्णय घेऊ नये. गर्भपिशवी काढल्यानंतर मासिक पाळी बंद होते. या शस्त्रक्रियेमुळे महिलांच्या आरोग्यावर मोठे परिणाम होऊ शकतात. – जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.
महिलांना भीती कर्जाचे ओझे वाढेल…
ऊसतोड हंगामापूर्वी कामगार जोडप्याने मुकादमाकडून उचल घेतलेली असते. ही उचल फेडण्यासाठी आणि मजुरी बुडू नये म्हणून महिलांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. उसाच्या फडात महिलांना पाण्याचा तुटवडा, मूलभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्याची कोणतीही हमी मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत, मासिक पाळीच्या त्या चार दिवसांतही काम थांबल्यास मजुरी मिळणार नाही आणि कर्जाचे ओझे वाढेल, या भीतीने या महिलांनी थेट गर्भाशयाची सर्जरी करून ते काढून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.
