जळगाव : पाळधी रेल्वे उड्डाणपुलावर मंगळवारी भरधाव आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने योगेश गजमल राक्षे (३२, रा. पथराड, ता. धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेशचा अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, बायपासवरील वाहतूक वळविल्यानंतर अपघातांच्या वाढत्या घटनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
योगेश हा आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होता. मंगळवारी तो मुकादम चेतन शितोळे यांच्यासोबत कामावर आला होता. दुपारी पावणेचारच्या सुमारास घरी जाण्यासाठी दुचाकीने निघालेला योगेश पाळधी रेल्वे उड्डाणपुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव आयशरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर योगेश दुचाकीसह पुलाच्या कठड्यावर आदळून गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर एका वाहनचालकाने योगेशच्या मोबाईलवरून मुकादम चेतन शितोळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर चेतन शितोळे व योगेशच्या चुलत भावाने घटनास्थळी धाव घेत त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
संसार सुरू होण्यापूर्वीच काळाचा घाला
योगेश हा आई-वडील व मोठ्या भावासह पथराड येथे राहत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. नव्या संसाराची सुरुवात झालेली असतानाच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेले आयशर वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल (३८, रा. भावनगर, कोलकाता) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील पोलीस कार्यवाही सुरू आहे
वाहतूक वळविल्यानंतर अपघातांची चिंता
३० जुलै रोजी बायपासवरील आसोदा पुलाचा भराव खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली. या बदलामुळे शहर परिसरातील वाहतुकीचा ताण आणि अपघातांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे. पाळधी उड्डाणपुलावरील या अपघातामुळे अवजड वाहनांची वर्दळ, वाहतूक नियोजन आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
