जळगाव : जिल्ह्यात अवैध गोवंश कत्तल आणि गोमांस विक्रीविरोधात जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित टोळीचा प्रमुख मुक्तार जमाल कुरेशी (वय ४०) आणि टोळी सदस्य परवीनबी मुक्तार कुरेशी (वय ४५) या दोघांना सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये ही कारवाई करण्यात आली. दोघेही जळगाव येथील फातेमा नगर परिसरातील ३६ खोल्या भागातील रहिवासी आहेत.
संबंधितांविरुद्ध एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र पशुसंवर्धन व पशुसंरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार दोघांना २७ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील सहा महिन्यांसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईतून अवैध गोवंश कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

