जळगाव – जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. रस्ता काँक्रीटीकरणाच्या बिलासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.
कनिष्ठ अभियंत्यामार्फत उपविभागीय अधिकाऱ्याने ती स्वीकारल्यानंतर एसीबीने झडप घातली.

सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५, उपविभागीय अधिकारी, वर्ग-१) आणि भागवत वसंत चवरे (वय ३२, कनिष्ठ अभियंता, वर्ग-३) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार ४२ वर्षीय सब-कंत्राटदार असून त्यांनी सन २०२५-२६ मध्ये धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे काम केले होते. या कामाची एकूण किंमत ९ लाख ९० हजार ७६३ रुपये होती.
काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मोजणी पुस्तिका (एमबी) तयार करणे आणि बिले बनविण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वीच तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारले होते. मात्र, काम पूर्ण होऊनही बिल मंजूर झाले नसल्याने तक्रारदाराने उपविभागीय कार्यालयात जाऊन विचारणा केली. त्यावेळी बिलावर स्वाक्षरी करून पुढील मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्यासाठी एकूण बिलाच्या १.५ टक्के प्रमाणे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनंतर एसीबीचा सापळा
लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने २ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. यावेळी पंचांसमक्ष झालेल्या चर्चेत १ टक्के प्रमाणे १० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी संबंधित कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर ही रक्कम त्यांनी उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष कारवाई करून रक्कम जप्त केली. या कारवाईत दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले.
अंगझडतीत सव्वा लाखांहून अधिक रक्कम
कारवाईनंतर दोन्ही अधिकाऱ्यांची अंगझडती घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडून ॲपल कंपनीचा मोबाईल फोन आणि ९१ हजार ६२० रुपये रोख रक्कम आढळून आली. तर कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि २० हजार ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघांकडील रोख रक्कम एक लाख १२ हजार २२० रुपये असून, लाचेच्या रकमेसह जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. ही कारवाई एसीबी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस हवालदार बाळू मराठे आणि महिला पोलीस हवालदार संगीता पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली
