नवी दिल्ली : चार वर्षांचा सेवाकाल पूर्ण

झाल्यानंतर सैन्यदलातून बाहेर पडणाऱ्या अग्निवीरांना आणखी दोन वर्षाची मुदतवाढ देण्याचा आणि त्यानंतर विशिष्ट पात्रता निकष पूर्ण केल्यास त्यांना कायमस्वरूपी सेवेत भरती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. संरक्षण दलांचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ-सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी या निर्णयाची घोषणा केली.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बदलांना मंजुरी देण्यात आली.
आधी काय होता नियम ?
जून २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांची चार वर्षांच्या कालावधीसाठी भरती करण्यात येत होती. त्यापैकी केवळ २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत कायम ठेवण्याची तरतूद होती. चार वर्षांचा सेवाकाल पूर्ण करून ३१ डिसेंबरपर्यंत सुमारे १८,३०० अग्निवीर सैन्यदलातून बाहेर पडणार होते. त्याच्या अवघ्या तीन आठवड्यांहून अधिक काळ आधी योजनेत हे बदल करण्यात आले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हा निर्णय संरक्षण दलांमध्ये दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे सांगितले.
सध्या किती अग्निवीर सैन्यदलांमध्ये ?
सध्या तीन लाखांहून अधिक अग्निवीर सैन्यदलांमध्ये कार्यरत आहेत. गुणवत्तेच्या आधारे २५% अग्निवीरांना नियमित सैन्यदलात भरती केले जाते, तर उर्वरित ७५% युवक बाहेर पडतात. नव्या बदलांनुसार, या ७५% अग्निवीरांनाही नियमित सैनिक म्हणून संधी मिळेल.
