उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अंकित भारतीय उर्फ इंद्रजित हा युवक १ ऑक्टोबर रोजी कामानिमित्त सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथे गेला होता. मात्र, तिथे पोहोचल्यावर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला उंट चरवण्याचं काम देण्यात आलं आहे.
सध्या वाळवंटात अडकलेल्या इंद्रजितने एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरी परत आणण्यासाठी मदतीची विनंती करतो.
इंद्रजितने दिलेल्या माहितीनुसार, त्याला ज्या कामासाठी सौदी अरेबियात बोलावलं होतं ते काम न देता त्याला जबरदस्तीने वाळवंटात उंट चरवण्यास पाठवण्यात आलं. त्याचा पासपोर्टही काढून घेण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो सांगतो की, “मी एकटा आहे, खूप भीती वाटते… मला माझ्या आईकडे परत जायचं आहे.”
इंद्रजितचा आरोप आहे की, तो आपल्या पत्नी पिंकी आणि सासरे राजेश सरोज यांच्या दबावाखाली परदेशात आला होता. आता मात्र तो घरी परतण्याची आसुसलेली विनंती करत आहे. त्याचे वडील जयप्रकाश भारतीय हे प्रयागराजमध्ये नोकरी करतात.
इंद्रजितचं लग्न जून २०२० मध्ये झालं असून त्याला एक ३ वर्षांचा मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या त्याचे कुटुंबीय त्याच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत चिंतित आहेत.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या व्हिडिओनंतर अनेकांनी भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करून इंद्रजितला सुरक्षित भारतात परत आणावे, अशी मागणी केली आहे.


