अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज
तालुक्यातील तळवाडे गावात मागील चार महिन्यांपासून मुक्काम ठोकून राहणाऱ्या वानराचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. विधीप्रमाणे अंत्ययात्रा काढून संपूर्ण गावाने १२ दिवसांचे सुतकदेखील पाळले आहे.
चार महिन्यांपूर्वी नर व मादी अशी दोन वानरे तळवाड्यात आली होती. सुरुवातीला गावकऱ्यांना त्यांची भीती वाटत होती, मात्र नंतर त्यांच्याशी स्नेह जडला. गावातील प्रत्येकजण त्यांना खाऊ घालत असे. वानरे घरांवरून, झाडांवरून, पाण्याच्या टाकीवरून उड्या मारत असत आणि त्यामुळे मुलांनाही गंमत वाटत असे.
१२ सप्टेंबर रोजी एक वानर पाण्याच्या टाकीवर चढले असताना अचानक खाली पडले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. गावकऱ्यांनी तातडीने झाडी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले, मात्र उपचाराआधीच वानराचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी त्याची विधिवत अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. डोली सजवून, वानराला स्नान घालून तिरडीवर ठेवण्यात आले. गावात रांगोळ्या काढण्यात आल्या, फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि वाजतगाजत वानरराजाला निरोप देण्यात आला. धीरज रामकृष्ण पाटील व योगेश पवार आगारी झाले तर रोहिदास हिरामण पाटील, भटू देविदास पाटील, संजय शालीक पाटील, संदीप रवींद्र पाटील व स्वप्नील छोटू पाटील यांनी खांदेकरी म्हणून जबाबदारी सांभाळली. पूजा व विधीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्याप्रमाणे कुटुंबातील कोणी सदस्य गमावला तर घरातील महिलेला दुःख देतात, त्याचप्रमाणे वेणूबाई पाटील यांनी दुःख स्वीकारले. परंपरेनुसार भावकी १२ दिवस त्या कुटुंबाच्या घरी जेवायला येते. तसेच गावकरीही मंदिरावर एकत्र जेवले. गावाने १२ दिवसांचे सुतक पाळले असून २२ रोजी दशक्रिया विधी तर २४ रोजी उत्तरकार्य व गंधमुक्तीचा कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी दुःख व्यक्त केले. पं.स.चे माजी उपसभापती भिकेश पाटील यांनीही अंत्ययात्रेला हजेरी लावली.

