पाचोरा : पोलीस वृत्त न्यूज महसूल खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला सहाय्यक महसूल अधिकारी गणेश बाबुराव लोखंडे (वय ३७) हा लाचखोर अधिकारी तब्बल १५ हजारांची लाच मागणी करताना अखेर अडकला. त्यापैकी पाच हजार आधीच खिशात घालून, उरलेली दहा हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी त्याला रंगेहात पकडलं. या धडक कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराची पत्नी पळसणे येथील शिवारातील जमीन वहिताखाली लावण्यासाठी अर्ज केला होता. नैसर्गिक आपत्तीची भरपाई आणि कर्ज मिळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असते. हे काम करून देण्यासाठी लोखंडे या भ्रष्ट अधिकाऱ्याने १५ हजारांची लाच मागणी केली. तक्रारदाराकडून आधी ५ हजार स्वीकारून, उरलेल्या दहा हजारांसाठी लोखंडे याने सतत तगादा लावला. संतापलेल्या तक्रारदाराने अखेर एसीबीकडे धाव घेतली.
९ सप्टेंबर रोजी सापळा रचून, बुधवारी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लोखंडे याला जळगाव एसीबीने जाळ्यात ओढलं.
कारवाई करणारे शिलेदार
ही धडाकेबाज कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, शिपाई भूषण पाटील, राकेश दुसाने व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.
👉 महसूल खात्यातील या रंगेहात कारवाईमुळे ‘लाच न देता कामच होत नाही’ ही जनतेची धारणा पुन्हा अधोरेखित झाली असून, इतर लाचखोर अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.


