धुळे : पोलीस वृत्त न्यूज धुळ्यातील साक्री–पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 40 एन 9014 क्रमांकाची एसटी बस साक्रीहून पिंपळनेरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी पिंपळनेरहून साक्रीकडे दोन दुचाकी (क्रमांक एमएच 39 एके 8546 आणि एमएच 18 बीवाय 5437) येत होत्या.
कान नदीच्या पुलावर बस आणि दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. या धडकेत लक्ष्मी दिनेश जयस्वाल (वय 12) हिचा मृत्यू झाला.
तर अपघातात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


