अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन शहरातील शिवशक्ती चौक परिसरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीनंतर काही असामाजिक घटकांनी गोंधळ घालत महिलांना अश्लील इशारे करून शिवीगाळ केली तसेच दगडफेक केल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिरवणूक आटोपल्यानंतर मोहसीन मेहमूद बागवान, शाहरुख बागवान, तन्वीर बशीर खाटीक, रेहान कलीम खाटीक यांच्यासह चार-पाच जणांनी गल्लीतील महिलांना अश्लील शिवीगाळ करीत इशारे दिले. इतकेच नव्हे, तर दगडफेक करून वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत एका महिलेच्या टाचेला दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची पळापळ झाली व गावभर दंगल झाल्याची अफवा पसरली. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
सदर महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ७९, २९६, ११५(२), ३५१(२), ३५२, १८९(२), १९१(२) अन्वये आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहरातील धार्मिक स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.


