जळगाव : पोलीस वृत्त न्यूज: जिल्ह्यात अपघातांच्या घटना सातत्याने घडत असून, सोमवारी चोपडा तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये टेमऱ्या उर्फ रगन जगन बारेला (वय १८) आणि मगन जगन बारेला (वय ३०, रा. वर्डी) यांचा समावेश आहे.
काय घडलं?
माहितीनुसार, दोन्ही भाऊ चोपड्यातून नवीन मोबाइल घेऊन दुचाकीवर (क्र. एमएच १९ एव्ही ८५८२) घरी परतत होते. माचला फाट्याजवळ अडावदकडून चोपड्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने (क्र. एमएच ०४ एचएफ ८२९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी रस्त्यावरून थेट शेताच्या बांधावर फेकली गेली. या अपघातात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मृत टेमऱ्या बारेला याचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता. येणाऱ्या दिवाळीत त्याचे लग्न ठरले होते; मात्र बोहल्यावर चढण्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोठा भाऊ मगन विवाहित असून त्याच्या पत्नी, चार मुली, एक मुलगा आणि आई-वडील असा मोठा परिवार आहे.
दोनही कमवत्या मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.


