पुणे : पोलीस वृत्त न्यूज पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या नांदेडमधील मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली. या अपघातात प्रतिभा आंबटवार (वय ३२) आणि कादंबरी गादेकर (वय १८, दोघी रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बळीरामपूर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भोसरी येथे खासगी कंपनीत कार्यरत असलेले कृष्णा आंबटवार हे पत्नी प्रतिभा व मुलीसह वास्तव्यास होते. ६ सप्टेंबर रोजी रात्री प्रतिभा आंबटवार व त्यांची भाची कादंबरी गादेकर काही नातेवाईकांसोबत गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.
दरम्यान, विसर्जन मार्गावरील एका टी पॉईंटजवळ ट्रकने वळण घेताना समोरून आलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रतिभा आणि कादंबरी मधोमध अडकून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बळीरामपूर येथे दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक, ग्रामस्थ आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वातावरण शोकाकुल झाले होते.
मृत्यू झालेल्या प्रतिभा आंबटवार यांच्या मागे सात वर्षांची कृषी ही मुलगी आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दोन निरपराध जीवांचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


