अमळनेर : पोलीस वृत्त न्युज– तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी उघड झाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ६ तासातच संबंधित घटना उघड करून यशस्वी तपास लावला आहे. हि घटना अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मिल, अमळनेर) असे मयत तरुण पतीचे नाव आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निघृण खून करून पसार झाला होता.
दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली. त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चौधरी (वय – ३५ रा. दोंडाईचा जि. धुळे) आणित पुजा तुषार चौधरी (रा. प्रताप मिल, अमळनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह कैलास शिंदे, मिलिंद सोनार, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ निलेश मोरे, शेखर साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, विनोद संदानशीव, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, होमगार्ड पूनम हटकर यांनी ही कारवाई केली आहे.
दोघांचे आधीपासून होते संबंध…
संशयित आरोपी पूजा तुषार चौधरी हिचे लग्नाआधी नातेवाईक असलेल्या सागर चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूजाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह तुषार चौधरी यांच्याशी लावून दिला. पुढे लग्नसंबंधातून त्यांना १ मुलगा, १ मुलगी झाले. वर्षभरापूर्वी पूजा हीची परत सागरशी ओळख झाली. त्यात त्यांच्या भेटीगाठी सुरु होऊन अनैतिक संबंध सुरु झाले. यात सागरने पूजासोबत पळून जाऊन लग्न करण्याचे ठरविले. हि गोष्ट सागरच्या पत्नीला माहित झाल्यावर त्यांच्यात वाद होऊन सागरची पत्नी हि माहेरी निघून गेली. तर दुसरीकडे मात्र याचा राग मनात धरून, सागर व पूजा यांनी तुषारला संपविण्याचा कट रचला.
गुरुवारी रात्री पूजाने पती तुषारला सागरची भेट घेऊन त्याला मदत करण्याविषयी सांगितले. त्यावेळी सागरने दारू आणि चिकन आणत त्याचे आमिष तुषार याला दाखवित मंगरूळ येथील एमआयडीसी भागात नेले. तेथे तूषारला भरपूर दारू पाजल्यावर संशयित आरोपी सागरने तुषारच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर सागर हा त्याच्या गावी निघून गेला. नंतर मोबाईल सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केवळ ६ तासात तपास लावून संशयितांना अटक केली आहे. अमळनेर पोलिसांच्या अल्पकालावधीत यशस्वी तपासाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.