नाशिकः पोलीस वृत्त ऑनलाईन – येथील इंदिरानगर भागातील सराफनगर परिसरात असलेल्या एका रो-हाऊसमध्ये पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच खोलीत त्यांची दहा वर्षांची मुलगीसुद्धा पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.

बुधवारी (दि.१८) सकाळी शेजाऱ्यांनी जेव्हा दरवाजाला धक्के मारून उघडले, तेव्हा हा हृदयद्रावक घटना समोर आली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तीघांच्या आत्महत्येमागील गुढ कायम आहे. विजय माणिक सहाणे (४१), ज्ञानेश्वरी सहाणे (३३), अन्यया सहाणे (१०) अशी तीघा मृतांची नावे आहेत.
इंदिरानगरमधील सराफ नगर हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात प्रतिगंगा रो-हाऊसमध्ये सहाणे कुटुंबीय वास्तव्यास आहे. विजय सहाणे हे सातपूर एमआयडीसी मधील एका कंपनीत नोकरी करत होते. ते त्यांचे वृद्ध आई,वडील, पत्नी, मुलगीसह याठिकाणी वास्तव्यास होते. अज्ञात कारणातून त्यांनी तसेच पत्नीते स्वत:चे आयुष्य संपविले. या दोघांनी मिळून मुलीलाही ठार मारल्याचा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे. या घटनेमागील कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

