अमळनेर : बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या भांडे वाटप योजनेत मोठा गोंधळ उडाला असून गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील नागरिक तालुक्यातील मंगरूळ येथे येऊन थांबले आहेत.
एखादी यात्रा भरावी याप्रमाणे मंगरूळ येथे भांडे घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.संपूर्ण जिल्ह्याची वाटप यंत्रणा कोलमडली आहे. कंत्राटदार सकाळी ११ वाजता येतात दुपारी २ वाजेनंतर शटर बंद करून घेतात. लोकांची एकच झुंबड उडते. मारामाऱ्या होत आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. लोकांना प्यायला पाणी नाही. खायला अन्न नाही. किती दिवस थांबावे लागेल याची शास्वती नाही. जिल्ह्यातील अनेक गावाच्या लोकांना एकाचवेळी बोलावल्याने मोठी गर्दी झाली. रात्री झोपायला जागा नसल्याने जंगलात झोपावे लागत आहे. विंचू ,साप विषारी कीटकांची भीती आहेच. सकाळी पुन्हा लावलेले नंबर उलट सुलट तर होतात आणि त्यावर महिलांमध्ये देखील वाद होत आहेत. काही महिलांसोबत लहान मुले देखील आली आहेत तर त्यांच्या घरी सांभाळणारे कोणी नाही. त्यामुळे त्या मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे देखील हाल होत आहेत.
रात्री उशिरा डॉ अनिल शिंदे यांनी भेट दिली असता त्यांनी व्हिडीओ कॉल वर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर ,डीवायएसपी सुनील नंदवाळकर , पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना गोंधळाची परिस्थिती कळवली. प्रशासनाने कंत्राटदाराला वाटप यंत्रणा , पाण्याची व्यवस्था , व इतर नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे._
रात्री उशिरा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी भेट देऊन पालिकेचे टँकर पाठवून व्यवस्था केली. सामान्य मजुरांचे हाल करणाऱ्या कंत्राटदार व एजंटवर प्रशासनने गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


