अमरावती: पोलीस वृत्त ऑनलाईन: एक धक्कादायक घटना सामोर आली आहे. पती पत्नीतील वाद आपल्याला नवीन नाही. कुठल्याही कारणाने दोघांमध्ये मतभेद होत असतात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला जातात. याचा परिणाम म्हणजे भयानक घटना घडतात
अमरावतीमधून अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने कौर्याची परिसीमा गाठत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गॅसवर पेटवून देण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील कापुसतळणी गावात दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुकेश तिडके असे या आरोपी पतीचे नाव आहे. तू कामाला जात नाहीस, तू बदमाश आहे, तू माझ्याजवळ राहू नको म्हणत पतीने पत्नीला गॅस वर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा पाय जळाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे. या घटनेनंतर आरोपी पती मुकेश तिडकेविरुद्ध माहुली जहागिर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.