जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन – जिल्ह्यातील जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मंगळवारी ३० जानेवारी रोजी ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असून पक्षांतर्गत विरोध व गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातून तीन वेळेस संजय गरुड यांनी अतिशय तगडे आव्हान उभे असून मंत्री गिरीश महाजन यांचे तगडे प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे संजय गरुड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यामुळे याचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहे.


