धुळे: पोलीस वृत्त ऑनलाईन: शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे प्रजासत्ताकदिनी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील १९ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, अजंदे खुर्द येथील सरपंच राजेंद्र उत्तम पाटील (वय ३७) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा बोलावण्यात आली होती. मात्र, ग्रामसेवक दुसऱ्या गावाच्या ग्रामसभेला गेलेले असल्याने जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका यांना ग्रामसभेचे सचिव नेमले होते. ग्रामसभा सुरू असताना उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने गोंधळ घालत एकाने टेबल फेकण्यास सुरवात केली. खुर्थ्यांचे नुकसान करुन सरकारी कामात अडथळा आणला. सरपंच राजेंद्र पाटील यांचे वडील उत्तम पाटील, भाऊ जितेंद्र पाटील व योगेश्वर अभिमन पाटील हे शेतात जात असताना त्यांना १० ते १२ जणांनी तलवार, कुन्हाड व लोखंडीसळई घेऊन मारहाण केली. यात तिघे जखमी झाले.
शिवाय, जितेंद्र पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व वडिलांच्या बोटातील सोन्याची अंगठी यात गहाळ झाली आहे. यावरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसभेत प्रश्न विचारल्याचा आला राग
दुसऱ्या गटाकडून गणेश अर्जुन माळी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ग्रामसभेत सरपंच राजेंद्र पाटील यांना शासनाकडून किती निधी आला व त्याचा खर्च कुठे केला, अशी विचारणा केली. * तसेच माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती मुदतीनंतरही मिळत नसल्याबाबत विचारणा एकाने केली. याचा राग आल्याने संबंधितांना शिवीगाळ करुन ग्रामसभेतून हाकलून देण्यात आले. यावेळी गणेश माळी यांच्या गळ्ळ्यातील सोन्याची चेन व हातातील चांदीचे ब्रेसलेट गहाळ झाले. यानंतर माळी घरी गेले असता हातात टॉमी, लाकडी दांडका व गुप्ती सारखे हत्यार घेऊन संशयितांनी दमदाटी केली. यावेळी माळी यांच्या पत्नी व वहिनी यांनाही मारहाण करण्यात आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

