अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन: आठ वर्षीय बालिकेला घरात बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन करून अत्याचार करणाऱ्या ज्ञानेश्वर बन्सीलाल रायशिंग कोळी (४२, रा. चोपडा) यास २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अवघ्या पाच महिन्यांत न्यायालयाने हा निकाल दिला. अमळनेर सत्र न्यायालयाचे न्या.पी आर. चौधरी यांनी गुरुवारी हा निकाल दिला. ज्ञानेश्वर रायसिंग याने दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी आठ वर्षांची बालिका खेळत असताना तिला घरात बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा प्रकार आपल्या आजीला सांगितला. आजीने शहर पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यावरून बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून महिनाभरात दोषारोपपत्र दाखल केले. एसपी एम. राजकुमार यांनी खटला जलद चालविण्याची मागणी केली होती.