अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– शिरुड येथील व्यायामासाठी राखीव असलेल्या क्रीडांगणावरील अतिक्रमण काढण्यासाठी युवकांनी आज संविधान दिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण मांडले आहे. संविधान दिनी संविधानाचे वाचन करत २६/११ भ्याड हल्ल्यातील वीरमरण पत्करणाऱ्या जवानांना विनम्र अभिवादन करत उपोषणाला सुरुवात करण्यात आली. याबाबत अतिक्रमण हटवण्याच्या पूर्व सूचना गटविकास अधिकारी यांना निवेदनात देण्यात आल्या होत्या. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत मालकीच्या गट क्र.5 मधील काही जागा ग्रामपंचायतने क्रीडांगणासाठी राखीव ठेवली असून तसा ठराव करण्यात आला आहे. मात्र त्या राखीव जागेवर गावातील नागरिकांनी रहिवास व गुरे बांधण्यासाठी शेड तयार करून घेतले असल्याने युवकांना व्यायाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत असल्याने युवकांना रस्त्यावर अंधारात व्यायाम करावा लागतो. मात्र सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या युवकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे क्रीडांगणावरील अतिक्रमण काढून क्रीडांगण युवकांसाठी मोकळे करून देण्याची मागणी गावातील तरुणांची आहे. अद्यापही उपोषणकर्ते तरुण मागणीसाठी ग्रामपंचायत समोर ठीय्या आहेत


