अमळनेर: पोलीस वृत्त ऑनलाईन– तालुक्यातील निम शिवारात अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन येत कापसाची गोणी बैलगाडीतून चोरुन नेल्याची घटना घडल्या प्रकरणी शेतकऱ्यांनी मारवड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शरद भिका धनगर (रा. निम) यांचे तांदळी रस्त्याला लागून शेत असून दिनांक २३ रोजी शेतात कापूस वेचणी सुरू होती व बैलगाडी रस्त्याच्या कडेला लावली होती त्यात कापूस वेचून गोण्या ठेवल्या जात होत्या. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर आलेल्या दोघांनी बैलगाडीतून कापसाने भरलेली एक गोणी उचलून पोबारा केला. सदर शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तपास केला असता दोन दिवसात निम येथील पुंजू शिरसाठ आणि लादू चौधरी या शेतकऱ्यांसोबत ही असा प्रकार घडला आहे. त्यामुळे तिन्ही शेतकऱ्याची बारा हजार किमतीचा १५० किलो कापूस अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची फिर्याद मारवड पोलीसात देण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोना मुकेश साळुंखे, पोकॉ अनिल राठोड, पोकॉ राजेंद्र पाटील, पोहेकॉ फिरोज बागवान, पोकॉ गुलाब महाजन, पोकॉ तुषार वाघ यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असता यात सुरेश देविदास भिल (वय ३१), भोला हिरामण हाके (वय २६) अशोक बुधा गायकवाड (वय २६) सर्व रा.ढढाणे ता.जि.धुळे यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.


