धुळे- पोलीस वृत्त ऑनलाईन: शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकटी असल्याचे पाहून अज्ञात व्यक्ताने घरात शिरून २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. ही घटना नकाने परिसरातील बालाजी नगर येथे घडली आहे. धक्कादायक घटना बुधवारी (२२ नोव्हेंबर २०२३) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

निकीता पाटील असे मृत तरुणीने नाव आहे. निकीता महाविद्यालयात शिक्षण घेत होती व नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे रहात होती. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ती घरी एकटीच होती. तिचे आई-वडील व भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर तिच्या घरासमोर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या करणारा कोण व हत्येच्या कारणांचा अद्याप उलगडा झालेला नाही.

