जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाइन- आपल्या परिवारा सोबत रात्री जेवल्या नंतर तेजस धोंडू पाटील (१९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. रविवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचे वडील त्याला खोलीत उठवायला गेले त्या वेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आई-वडील व लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्याच्या वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. आयटीआयचे शिक्षण घेतलेला तेजस हा वडिलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करीत होता. शनिवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री तेजसने हा आई-वडील व बहिण यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर तो झोपण्यासाठी वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. मध्यरात्री त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी वडील धोंडू पाटील हे मुलाला उठविण्यासाठी गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांचा धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारच्या मंडळींनी धाव घेतली. या विषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोकॉ सदाब सय्यद करीत आहेत


