शिंदखेडा: मंथन साळुंखे शहरातील तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी “मध्यवर्ती प्रशासकीय इमारत” म्हणजेच तहसीलदार कार्यालय. येथील सध्याची परिस्थिती चांगलीच दयनीय झालेली आहे. जनतेच्या पैशांतून उभी झालेली कोट्यावधी रुपयांची ही वास्तू गुटखा प्रेमींच्या जाचापासुन मोकळा श्वास मागत आहे. गुटखा खाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात जरी असली तरी गुटखाबंदी वर काम करणारी शासन यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडलाय??
शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर काना-कोपर्रात तर मोठ्या प्रमाणात गुटख्याचे थुंकलेले आहेच पण तहसील प्रशासन इतके आंधळ्या सारखे वागतेय कि अक्षरशः अभिलेख कार्यालय, निवडणूक कार्यालय, कर्मचारी वर्ग यांच्या कार्यालया बाहेरच्या सर्व भिंती पांढरा रंगाच्या असुन त्यावर विमल गुटखा खाणार्रयांनी त्यांचा ‘बोलो जुबा केसरी” वाला केसरी रंग दिलाय त्याचबरोबर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आतील मोकळ्या जागेत अनावश्यक पिंपळाची रोपे व अनावश्यक रोगराई पसरविणारे गवत माजलेलज दिसुन येते. कचरा फेकण्यासाठी या इमारतीत एक ही कचरा पेटी दिसून येत नाही. एकीकडे केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा रथ प्रगतीपथावर असतांना तालुका प्रशासन मात्र डोळे मिटून व तोंड बंद ठेवून सर्वसामान्यांच्या पैशांतून उभी राहिलेली प्रशासकीय इमारतीचा अपमान करतांना दिसुन येत आहे.
शिंदखेडा तहसील कार्यालय इमारतीतील प्रसाधन गृहांची अवस्था ही अत्यंत गंभीर स्वरूपाची झालेली आहे. एकंदरीत शिंदखेडा तालुक्याच्या “मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला” स्वच्छता कर्मचारी आहेत की नाहीत? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि गुटख्याच्या अवैध तस्करी वर नेहमी पाळत ठेवणारे प्रशासन शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रशासकीय इमारतीच्या आवारात सर्रास विकला जाणारा गुटखा पोलिस प्रशासनालाही दिसुन येत नाही का? हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो?
शिंदखेडा शहरातील प्रशासकीय इमारत ही शहाराची शान व अभिमान आहे तिचा आदर व निगा प्रशासनाकडूनच राखली जात नसेल तर भविष्यात तेथे अजुन जास्तीची घाण करायला नागरीक मागे-पुढे पाहणारं नाहीत. “आंधळ दळतंय, कुत्र पिठ खातयं” अशी अवस्था तालुका प्रशासनाची होऊ नये अशी आशा नागरीक करत आहेत.





