पाचोरा: पोलीस वृत्त- ऑनलाईन: सध्या अनेक तरुण पिढी ही शिक्षण घेऊन देखील बेरोजगारीच्या स्थितीत जीवन जगत आहे. अनेक सुशिक्षित तरुण हे छोट्या- मोठ्या खाजगी कंपनीमध्ये कमी पगारावर काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे. अनेक तरुण शासकीय नोकरीच्या आशेवर अद्याप अहोरात्र कष्ट करत मेहनत करत अभ्यास करत आहे. शासकीय नोकरी मिळणे आता कठीण झाले असून याचा फायदा घेत नोकरीचे आश्वासन देणारे दलालांचा मात्र सुळसुळाट झालेला दिसत आहे. अशातच एक प्रकार पाचोरा तालुक्यात घडला रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने युवकाची तब्बल 20 लाखात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील रहिवाशी मोहन फकीरा चौधरी वय-५६ यांच्यासह एकाला त्यांच्या मुलांना रेल्वे विभागात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत संशयित आरोपी प्रकाश हरचंद सोनवणे रा. भुसावळ याने दोघांकडून वेळोवेळी तब्बत २० लाख रूपये घेतले. त्यानंतर नोकरी लावण्याबाबत कोणतीही ऑर्डर आली नाही. त्यानंतर दोघांनी संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. परंतू पैसे दिले नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोहन चौधरी व त्यांचे सहकारी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश सोनवणे याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील करीत आहे.

