मुंबई : वृत्तसंस्था
एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेलमध्ये बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हि घटना पनवेलमधील विचुंबे भागामध्ये घडली आहे. यामध्ये एका सावत्र बापाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत असून काही महिन्यांपूर्वी या पीडित मुलीवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. मागच्या आठवड्यात या पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिला आईने रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर खांदेश्वर पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. यानंतर पीडित मुलीने आपल्यावर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.