चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील शांती नगरातील एका ४४ वर्षीय वृद्ध व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याची दुचाकी अडवली आणि त्याच्याकडील दोन लाख ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. येथील संजय हशमतराम मंदानी (४४) हे शांतीनगरात परिवारासह वास्तव्यास आहेत.
मिळालेली माहिती अशी कि, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते विक्री व उधारीची जमा झालेली २ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम बॅगेत ठेवून मोटारसायकलने घराकडे निघाले. मंदानी हे घरापर्यंत आले असता त्यांचा पाठलाग करत दोन दुचाकी तिथे आल्या. एकाने दुचाकी समोर आडवी लावली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन जणांनी मंदानी यांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी मंदानी यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.