जळगाव, दि.३० – जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ अशी आर्त हाक घातली. पिढीजात संपत्तीत हिस्सा न देण्यासाठी तिचा छळ केल्याचे समोर आले असून पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील शनिपेठ परिसरात राहणाऱ्या कोमल सुरेश देवरे या तरुणीचा २१ मार्च २०१६ रोजी नाशिक येथील अभिजीत राजेंद्र बेलगावकर यांच्यासोबत विवाह झाला होता. जुनी महानगरपालिका, मेन रोड येथे सर्व कुटुंबीय एकत्र राहत होते. पावसाळ्यात घर गळत असल्याने सर्व कुटुंबीय हिरावाडी येथे राहावयास गेले. दोघांच्या संसारावर निलराज हा मुलगा देखील झाला. काही दिवसांनी कोमलची सासू किरकोळ कारणावरून कोमल आणि तिची देरानी मीनाक्षी यांच्याशी वाद घालत असल्याने दोघे वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेले.
गेल्या सहा महिन्यापासून कोमल ही पती अभिजीत आणि मुलगा निलराज असे तिघे चिंतामणी नगर, पंचवटी येथे भाड्याच्या घरात राहावयास आले होते. कोमलने स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू करून सर्व संसारोपयोगी साहित्य देखील खरेदी केले. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोमलची आई मंगलाबाई देवरे या थायरॉईडच्या उपचारासाठी नाशिक येथे गेल्या होत्या. कोमलची देरानी मिनाक्षीचे पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी गेल्याचे तिने आईला सांगितले. १ जानेवारी २०२३ रोजी कोमलची आई घरी परतली. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी जुन्या घराची दुरुस्ती केली असून ते सर्व तिकडे राहायला जात असल्याचे तिला जेठाणी मेघाने सांगितले. कोमलने देखील पती अभिजीत यांना आपण तिकडे राहायला जाऊ असे सांगितले असता, मला तिकडे राहायचं नाही, मला ते घर पण नको असे ते बोलले.
कोमल स्वतः सासू भारती यांच्याकडे गेली आणि आम्हाला देखील घरात राहू देण्याची विनंती केली असता सासूने नकार दिला. सासूने नकार दिला असता जुन्या संपत्तीमध्ये मुलगा निलराज याचे देखील नाव घावे असे कोमल सासूला बोलली असता त्यांनी देखील वाद घातले. सर्व प्रकार कोमलने मामसासरे ईश्वर चौधरी यांना कळविला. त्यांनी कोमलच्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केल्याने सर्वांना कोमलचा राग आला. त्यांनी कोमलचा छळ सुरू केला. पती अभिजीतने देखील तू प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागत असशील तर मी तुला घटस्फोट देऊन माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल अशी धमकी दिली. तसेच कोमलच्या चारित्र्यावर संशय घेत तिला त्रास देणे सुरू केले. घडत असलेला सर्व प्रकार कोमलने आई मंगलाबाई व भाऊ कमलेश देवरे याला कळविला होता.
कोमल ताणतणावात असल्याने तिला माहेरच्या मंडळींनी समजावले होते. अभिजीतने कमलेशला घरातील वादविवाद वाढत असल्याने नाशिक येथे भेटण्यासाठी बोलाविले असता कामात असल्याने ३० जानेवारीनंतर आम्ही नाशिक येथे येतो असे सांगितले होते. दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजता कोमलने आईला फोन करून सांगितले की, माझी सासू, जेठ, जेठाणी, दिर हे मला धमकावत असून तुमची मिटिंग होऊ देणार नाही असे सांगत आहे. तुला तुझा हक्क मिळू देणार नाही असे म्हणत असून नवरा साथ देत नाही. मला काही न्याय मिळणार नाही, असे बोलून तिने फोन कट केला. कोमलच्या आईने त्यानंतर अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
११.३० वाजता एका अनोळखी क्रमांकावरून कोमलच्या आईला फोन आला. कोमलला उलट्या होत आहे असे एका अनोळखी महिलेने सांगताच कोमलने फोन घेतला आणि ‘आई आई माझ्या निलला न्याय दे जो’ असे बोलून फोन कट झाला. कोमलच्या आईने जावई अभिजीतला फोन केला असता मी त्र्यंबकला आहे. आई, दादा, वहिनी कोमलला पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने पुन्हा फोन केला असता कोमलला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून ती आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. कोमलची आई व वडिलांनी रेल्वेने रात्री नाशिक गाठले असता ९ वाजता डॉक्टरांनी तिने विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
कोमलची आई मंगलाबाई सुरेश देवरे यांनी फिर्यादी दिल्यावरून पंचवटी पोलीस ठाण्यात कोमलचा पती अभिजीत राजेंद्र बेलगावकर, सासू भारती, जेठ आकाश, जेठाणी मेघा, दिर अमित यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत. मयत कोमल देवरे या जळगावातील पत्रकार कमलेश देवरे यांच्या भगिनी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, मुलगा असा परिवार आहे.