जामनेर प्रतिनिधी: तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल हाती आल्याने बहुतेक ठिकाणी जल्लोषात मोठ्या उत्साहाने विजयाची मिरवणूक काढण्यात आली आहे. दरम्यान, जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावात विजय मिरवणूकीत झालेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचात निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार गावात गेले असता त्यांच्यावर विरोधी गाटाच्या पॅनलकडून काही लोकांनी जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत धनराज शिवराम माळी रा. टाकळी खुर्द या तरूण गंभीर जखमी झाला होता. त्यांला तातडीने जामनेर येथील उपजिल्हाप रूग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमूळे टाकळी खुर्द गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जामनेर पोलीसांनी गावात धाव घेतली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.