चोपडा: तालुक्यातील हातेड ते गलंगीच्या दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.

हातेड. गलंगी दरम्यानकाल सायंकाळी भीषण अपघात झाला. घोडगाव येथील कमलाकर बारेला व कुसुंबा येथील गोलू बारेला हे दोन्ही एम एच १९ बी पी ४९४० या क्रमांकाच्या दुचाकीने चोपड्याहून गलंगीकडे जात होते. या मार्गावर पाटचारीजवळ त्यांना मागून ट्रकने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. दरम्यान, अज्ञात वाहनाने दुचाकीला टक्कर दिल्यानंतर त्याचा चालक ट्रकसह फरार झाला.
दुचाकी अपघातामुळे मागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाला अचानक ब्रेक दाबावा लागला. यामुळे त्याची ट्रॉली पलटून सहा-सात मजूर जखमी झाले. रात्री उशीरा दोन्ही पार्थिव रुग्णालयात आणण्यात आले होते. याबात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

