उत्राण : प्रतिनिधी येथील शालेय विद्यार्थिनीला दोघांसह एका महिलेने बळजबरीने बुंदीच्या लाडूत गोळी देवून गुंगीचे औषध देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थिनीने हतातच राखून आरडाओरड केल्याने वेळीच तिघे तेथून पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उत्राण येथे घडली.
उत्राण येथील संजय (दिनकर) प्रभाकर महाजन यांची कन्या प्रांजली महाजन ही एस. बी. संघवी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावीचे शिक्षण घेत आहे. प्रांजली ही २२ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्कूल बसची वाट पाहत उभी होती. या वेळी प्रांजलीजवळ दोन अज्ञात व्यक्तींसह गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली एक महिला आली. या महिलेने नाकात दोन्ही बाजुला नथ घातलेली होती, तर तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचे पांढऱ्या रंगाचे कपडे होते. या वेळी महिला व त्या दोघांपैकी एकाने प्रांजलीला बळजबरीने बुंदीचा लाडू देवून तो खाण्यासाठी जोर दिला. त्यामुळे घाबरलेल्या प्रांजलीने तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या महिलांना आवाज दिला. हे पाहून त्या महिलेसह ते दोघे पुरुष गाडीवर बसून पसार झाले. दरम्यान, ही माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, पोलिस पाटील राजेंद्र महाजन यांनी या घटनेबाबत तत्काळ कासोदा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल नितीन मनोरे यांनी घटनास्थळी भेट देवून लाडू तपासणीसाठी त्यांनी ताब्यात घेतला. यामुळे पालक धास्तावले आहेत.
लाडूत आढळली गोळी
प्रांजली हिने तो लाडू महिलांना दाखवला. महिलांनी हा फोडून पाहिला असता, त्यात एक गोळी आढळली. ही घटना समजताच ग्रामस्थांनी या तिघांचा शोध सुरु केला. परंतु, ते सापडले नाहीत.