पोलीस वृत्त:- आज दहीहंडी असून दहिहंडीवेळी किरकोळ दुखापत झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती.

भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र दही हंडी उत्सव साजरा करत असताना अनेकदा गोविंदा हे जखमी होतात. गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार आज राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना निःशुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहणार आहे.

