अमळनेर पोलीस वृत्त ऑनलाईन दि. ३१ डिसेंबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अनंत रमेश निकम (रा. श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर) याच्याविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अशोक खलाणे हे चाळीसगाव येथील महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ या संस्थेत सचिव पदावर कार्यरत असून, संस्थेच्या अखत्यारीत १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालये चालविली जातात. संस्थेअंतर्गत जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील १५ शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून सेवा समाप्तीचे आदेश फिर्यादी यांनी दिले होते.
या कारवाईचा राग मनात धरून संबंधित शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी करून संस्थेवर प्रशासक नियुक्तीचा आदेश मिळविला होता. मात्र, या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी मा. उच्च न्यायालयात धाव घेऊन प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला स्थगिती मिळविली होती. याच पार्श्वभूमीवर, दिनांक ०८/११/२०२५ रोजी आरोपी अनंत रमेश निकम याने फेसबुकवरील अनंत निकम या प्रोफाईलवरून संस्थेबाबत खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर दिनांक ०९/११/२०२५ व १४/११/२०२५ रोजी आरोपीने आपल्या साथीदारांमार्फत फिर्यादी यांना अमळनेर येथे बोलावून एकूण २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास खोटी माहिती, बनावट व्हिडीओ प्रसारित करून दखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांत अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मध्यस्थीअंती खंडणीची रक्कम कमी करून ४ ते ५ लाख रुपये देण्याचा दम आरोपीने दिल्याने फिर्यादी यांनी अखेर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात मुख्य आरोपी अनंत रमेश निकम यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत.

