अमळनेर : पोलीस वृत्त न्यूज तालुक्यातील मौजे आर्डी–जवखेडे रस्त्यावर महसूल विभागाच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहेत.
तालुक्यात सर्वत्र डंपरद्वारे वाळूचा उपसा सुरू असताना महसूल पथकाने फक्त दोन ट्रॅक्टर पकडत ‘दुधाची तहान ताकावर भागवली’ अशी चर्चा जनतेत सुरू आहे.
ट्रॅक्टर पकडणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी पी. एस. पाटील, महसूल अधिकारी संदीप माळी, तसेच एम. आर. पाटील, विक्रम कदम, जितेंद्र पाटील, विकेश भोई, अमोल चक्रे, आकाश गिरी, सुधीर पाटील आणि पवन शिंगारे यांचा समावेश होता.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का?
वाळू चोरीच्या प्रकरणांवर शास्ती लावून फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार राज्य शासनाने स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. १७ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार अशा प्रकरणांवर फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.
मात्र, प्रत्यक्षात अनेक वेळा पकडलेली वाहने केवळ शास्ती आकारून सोडून दिली जात असल्याचे दिसते. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची हिंमत अधिकारी दाखवणार का? — हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.


