नंदुरबार: पोलीस वृत्त ऑनलाईन न्यूज कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबारमध्ये अंगणवाडीमधून मिळणाऱ्या सेवाही तोकड्याच आहेत. तरीदेखील, अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांचे योग्य संगोपन करून त्यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो.
अंगणवाड्यांची स्थिती सर्वांना माहिती आहे. शहरात अनेक उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतानाही, जर जिल्हाधिकाऱ्यांचीच मुले अंगणवाडीत प्रवेश घेत असतील, तर…?
होय! नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांना टोकरतलाव गावातील अंगणवाडीत प्रवेश दिला आहे. नुकतेच तिसरा वाढदिवस साजरा करणारे शुकर आणि सबर या भावंडांचा अंगणवाडीत झालेला प्रवेश पालकांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा ठरला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आता अंगणवाडीत आपोआपच दर्जेदार सेवा मिळेल, अशी अपेक्षा इतर पालक व्यक्त करत आहेत.
नंदुरबारपासून अवघ्या तीन-चार किलोमीटरवर असलेल्या टोकरतलाव येथील अंगणवाडीत जिल्हाधिकारी दाम्पत्याने आपल्या जुळ्या मुलांना प्रवेश दिला. सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत डॉ. मित्ताली सेठी आणि त्यांचे पती डॉ. वैभव सबनीस यांनी हा निर्णय घेतला. सोमवारी मुलांचा वाढदिवस असल्याने जिल्हाधिकारी स्वतः त्यांना घेऊन अंगणवाडीत गेल्या होत्या.
या अंगणवाडीत सेविका आणि मदतनीसांनी खासगी शिंपीच्या मदतीने नाविन्यपूर्ण झोळी तयार केली आहे. मुलं त्यात बसल्यावर रडत नाहीत, हे विशेष वैशिष्ट्य आहे. सेविका आणि मदतनीसांनी मुलांना दिलेली प्रेमळ वागणूक पाहूनच आपल्या मुलांना या अंगणवाडीत प्रवेश द्यावा असे वाटल्याचे डॉ. सेठी यांनी सांगितले.
शाळा आणि अंगणवाडी एकाच आवारात असल्याने मुलांना सोडताना शाळेवरही लक्ष राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. “माझी मुले अंगणवाडीत गेल्यानंतर इथे काही सुधारणा झाल्या, तर त्या संकल्पना संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लागू करता येतील,” असे डॉ. सेठी यांनी लोकसत्ताला सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडींमधून कुपोषण कमी करण्याची मोठी जबाबदारी असतानाही, यंत्रणेला फक्त मालसाहित्याच्या पुरवठ्याच्या ठेक्यांतच रस असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशा वेळी जिल्हाधिकाऱ्यांची मुलेच अंगणवाडीत दाखल झाल्यामुळे, महिला व बालकल्याण विभागाला दर्जेदार सुविधा पुरवण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांमुळे इतर मुलांचाही लाभ होईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेतून मुलांना अंगणवाडीत प्रवेश दिल्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


