जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरलीय.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे हे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून घरी जाताना मोटरसायकल अपघातात दरीत कोसळून त्यांचे दुःखद निधन झाले आहे. विपिन खर्चे यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. या अंत्यविधीला शासकीय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी समोर आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

