धुळे- पोलीस वृत्त न्यूज शहर-जिल्ह्यातील काही लॉज, हॉटेल व कॅफेबद्दल संशय व तक्रारी असल्याने या ठिकाणी पोलिसांनी गुरुवारी अचानक पाहणी केली. शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील लॉजमध्ये ४ तरुण व ४ तरुणी आढळले. जिल्ह्यात ८३ ठिकाणी तपासणी झाली. त्यातून ६६ तरुण व तरुणींना ताब्यात घेतले. त्यात बहुतांश तरुण, तरुणी महाविद्यालयीन आहेत. त्यांच्या पालकांना याविषयी माहिती देऊन पालकांकडे सोपवण्यात आले.
पोलिस दलाने गुरुवारी शहरासह जिल्ह्यातील लॉजमध्ये तपासणी करत रजिस्टर व इतर माहिती बघितली. शहरातील आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ लॉजची पाहणी झाली. गल्ली क्रमांक पाचमधील एका लॉजच्या काही खोल्यांमध्ये ४ तरुण व ४ तरुणी आढळले. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५८ लॉज, १८ हॉटेल व ७ कॅफेंची तपासणी झाली. या ठिकाणी ६६ तरुण व तरुणी आढळले. पोलिसांना पाहून त्यांची भंबेरी उडाली. काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व तरुण व तरुणींना पोलिस ठाण्यात आणले. सर्वजण १८ वर्षांपुढील उच्चशिक्षित आहेत. पोलिस ठाण्यात त्यांचे नाव व पत्ता घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना कळवले. तसेच समज देत त्यांना पालकांच्या स्वाधीन केले. दुपारी ४ वाजेनंतर पालक धावत पोलिस ठाण्यात येत होते. सर काय झाले, आमची मुले कुठे आहेत, काय केले त्यांनी, असे प्रश्न पालक पोलिसांना विचारत होते. शिररपूरला सर्वाधिक २८, देवपूर व चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १०, मोहाडीत २ आणि इतर ठिकाणी कारवाई करण्यात आली.

विवाह ठरला लॉज मध्ये सापडले– आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ८ जणांमधील एका तरुण व तरुणीचा विवाह ठरला आहे. ते दोघही लॉजमध्ये सापडल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात आल्यावर त्यांची खरडपट्टी काढली.

