अमळनेर ः पोलीस वृत्त ऑनलाइन – पालिकेच्या घंटा गाडीवर मजुरी करणार्या कर्मचार्यास किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ व बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना फरशी रोडवर 28 सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी येथील पोलिसात पाच जणांवर अॅट्रासिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष श्रावण बिर्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी पालिकेच्या कचरा गाडीवर मजुरीचे काम करून परिवाराची उपजिविका भागवतो. आमच्या घराच्या परिसरात मुस्लिम वस्ती आहे. दिलावर अब्दुल रहीम, मुन्ना इलियास खाटीक, तोसीफ ताहेर बेलदार, सलमाम बाबा फकीर व मुज्या बेलदार आणि इतर दोनण जण 28 सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास मी बाजारात जात असताना रस्त्यावर विनाकारण अपापसात शिवीगाळ करत होते. मी त्यांच्या जवळ जावून त्यांना समजूत घालून भांडण आवरत होतो. विनाकारण शिवीगाळ करू नका आमच्या घरात महिला राहातात असे सांगित्याचा त्यांना राग आला. यावेळी दिलावर याने माझ्या शर्टची कॉलर पकडून मला गालावर मारले. माझी आई हिराबाई श्रावण बिर्हाडे मला त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी आली. यावेळी सलमान याने आईचे हात धरून आईलाही शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मी आईला वाचविण्यासाठी गेलो असता दिलावर याने रिक्षातून लोखंडी रॉड काढून माझ्या तोंडावर मारला. यात मला गंभीर दुखापत होऊन माझे सहा दात तुटले. मी जमीनीवर खाली कोसळल्यानंतर ते निघून गेले. मला आईने रीक्षात बसवून सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर मला धुळे येथे हलविण्यात आले होते. मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी आज पोलिस ठाण्यात जावून याबाबत फिर्याद दिली आहे, असेही यात म्हटले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात पाच जणांवर अॅट्रासीटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलम व हवालदार संतोष पवार तपास करीत आहेत.