बँनर ठरवणार मंत्री अनिल पाटील यांचे भवितव्य
उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौराच्या पार्श्वभूमीवर,अमळनेरात लक्षवेधी बॅनर!
अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाइन: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सोमवारी अमळनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला येत आहे. मात्र त्यांचे स्वागत हे शरद पवार राष्ट्रवादीकडून ‘ते (अनिल दादा) पुढच्या विधानसभेला निवडून आलेले दिसणार नाहीत.. याची आम्ही काळजी घेऊ.. ’ या शरद पवारांच्या वक्तव्याच्या बॅनरने होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरमुळे मंत्री अनिल पाटील यांना उमेदवारी देण्याविषयी अजित दादा पवार यांचा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसापासून अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपली आमदारकी शाबूत ठेवण्यासाठी मंत्री अनिल पाटील जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांना गळाला लावले आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरीनीही साक्ष फिरवल्याने राजकीय फितूरी दिसून येत आहे. मात्र शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसत मंत्रीपद मिळवणारे अनिल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिक आणि शरद पवारांची राष्ट्रवादी विसरलेली नाही. तर खुद्द शरद पवार यांनी एबीपी माझाला ” ते (अनिल दादा) पुढच्या विधानसभेला निवडून येणार नाहीत.. याची आम्ही काळजी घेऊ…! ” असे विधान करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. त्याची आठवण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा यांनाही या बॅनरच्या रुपाने अमळनेरात करून देण्यात येणार आहे. अमळनेर शहरातील चौकाचौकात हे बॅनर लागले असल्याने त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या बॅनरवर तुतारीचे चिन्ह असल्याने जणू ते तुतारी फुंकून मंत्री अनिल पाटील यांनी खुद्द शरद पवारांच्या विषयी केलेल्या चुकीच्या विधानाचा बदला घेणार आहेत. असे या बॅनरवरून भासत आहे. त्यामुळे सोमवारी अजित पवारांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला हे बॅनर एका अर्थाने निवडणुकी आधीच सुरुंग लावत आहेत. त्यामुळे अनिल पाटील यांचे मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..चे स्वप्न धुळीस मिळेल, असे शहरातील राजकीय विश्लेषकांडून सांगितले जात आहे…!