पुणे: शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला परिसरात चुलती व पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. कल्पना रवींद्र शिंदे (Kalpana Ravindra Shinde) (वय ३१) व सचिन दौलत शिंदे(Sachin Daulat Shinde) (वय २४, रा.दोघेही, गणेगाव दुमाला, ता. शिरूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेने शिरुर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे व गोविंद ज्ञानदेव शिंदे (दोघेही रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला ग्रामपंचायत हद्दीतील संगमेश्वर वस्ती परिसरात कल्पना रवींद्र शिंदे तसेच सचिन शिंदे कुटुंबियांसोबत राहत होते. रविवारी (ता.४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसताना कल्पना शिंदे यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असतानाच सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा पुतण्या सचिन दौलत शिंदे (वय २४) यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, याबाबत शिरूर(shirur)पोलीस ठाण्यात दौलत शिंदे व गोविंद शिंदे यांनी माहिती दिली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संपत खबाले व पोलीस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.